गोंदिया -जिल्हा परिषदेच्या प्रांगणात एका डॉक्टराने भर उन्हात छत्री आंदोलन सुरू केले आहे. डॉक्टरांना अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण होते, या मारहाणीच्याविरोधात डॉक्टरने छत्री आंदोलन सुरू केले आहे. डॉ. समीर गहाने असे या डॉक्टरचे नाव आहे. ते सध्या खोडसीवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत.
आज आंदोलनाचा सातवा दिवस
एकीकडे राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये डॉक्टर आपल्या जीवाची परवा न करता रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये रुग्णांचे नातेवाई आणि लोकप्रतिनिधींकडून डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा लोकांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आरोग्याधिकारी तसेच आरोग्यमंत्र्यांना देखील पत्रे पाठवली होती. मात्र त्यांच्या पत्राची दखल न घेण्यात आल्याने त्यांनी अखेर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आंदोलनाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे डॉ. समीर गहाने हे खोडसीवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. ते दररोज आपली सेवा बजावून दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा आज सातवा दिवस असून, जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -पोलीस अधिकाऱ्याने वृद्ध महिलेचा भाजीपाला फेकला रसत्यावर; व्हिडिओ व्हायरल