गोंदिया - १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक भेटवस्तू (गिफ्ट) एकमेकांना दिल्या जातात. मात्र, यादिवसाच्या निमित्ताने येथील सुवर्ण पदक प्राप्त कार्डीओलॉजिस्ट डॉ. प्रमेश गायधने यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना 'संजीवनी किट' भेट दिली आहे.
आजच्या काळातील जीवनशैली शहराप्रमाणे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात बदलत चालली आहे. यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. हृदयविकाराच्या झटक्याने कोणत्याही रुग्णाला धोका होऊ नये, वेळेवर उपचार मिळता यावे, यासाठी डॉ. गायधने यांनी 'संजीवनी किट' तयार केली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना हे किट व्हॅलेंनटाईन डेच्या निमित्ताने भेट दिली आहे. या किटमुळे अनेक हृदयरूग्णांचे जीव वाचायला मदत होणार आहे.
गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल आहे. जिल्ह्यातील हृदयरोग असलेल्या रूग्णांना उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी यायला खुप वेळ लागतो. परिणामी रुग्णांचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी डॉ. गायधने यांनी ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांना हे संजीवनी किट भेट दिले आहे.
हेही वाचा -हे राम..! नाशिक मनपाच्या शाळेत आसाराम बापुंच्या विचारांचे धडे
कसे आहे हे 'संजीवनी किट' ?
हृदयघात, आणीबाणीच्या वेळी लागणाऱ्या सगळ्या औषधी या एकाच किटमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या औषधांत 'अस्पारीन, क्लोपीडोग्रेल, अर्टोवास्टाटीन, हेपारिन, सोर्बाटेट, लासीक्स' या औषधी आहेत. यात आणीबाणीच्या वेळी हृदयरोगांच्या कामी पडेल, यासाठी मदत म्हणून स्वत:च्या मोबाईल क्रमांक दिला आहे. हृदयरोगाचा झटका आल्यावर पहिल्या तासात काय करावे, याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. प्राथमिक उपचार मिळाल्यास रूग्णांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. यासोबतच ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मोफत मार्गदर्शन करून हृदयविकारावर मात करता यावी, म्हणून डॉ. गायधने यांनी महाकॅप नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. महाकॅपमध्ये राज्यासह देशातील २० डिएम कॉर्डीओलॉजीस्ट सहभागी आहेत.