गोंदिया- शुक्रवार 24 मार्चपासून सुरू झालेल्या पवित्र रमजानच्या सायंकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटरवरून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मशिदीतूनच मौलवी अजान देतील. मात्र, मशिदीमध्ये एकत्र येऊन नमाज पठण न करता सर्वांनी आपापल्या घरीच नमाज पठण करावे, असे त्यांनी म्हटले आहे. गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आले असताना त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
मशिदीतून मौलवी अजान देतील, लोकांनी घरीच नमाज पठण करावे - गृहमंत्री देशमुख - gondia anil deshmukh
या पवित्र रमजान महिन्यात मशिदीतून मौलवी अजान देतील. मात्र मशिदीत एकत्र न जमता आपापल्या घरीच नमाज पठण करतील, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री तसेच गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी गोंदियात इटीव्ही भारतशी बोलताना दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांकडून मशिदीच्या ट्रस्टींना मशिदींमधून अजान दिल्यास कारवाई करण्यात येईल, अशा नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे याबाबत मुस्लीम बांधवांमध्ये संभ्रम झाले असल्याचे ईटीव्ही भारतने समोर आणले होते. याबाबत गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.
गृहमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख हे शनिवारी गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आले होते. आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विचारलेल्या प्रश्नावर अनिल देशमुख म्हणाले, की रमजानचा पवित्र महिना सुरु झालेला आहे. या वेळी राज्यशासनाकडून सर्वांना कडक सूचना आहेत, की हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई या सर्व धर्मांच्या लोकांना राज्य शासनाच्या माध्यमातून वारंवार विनंती करण्यात आली आहे. सर्वांनी आपले सण सार्वजनिक पद्धतीने एकत्र न येता साजरे करावे, अशा पद्धतीच्या सूचना आम्ही आमच्या मुस्लीम बांधवांना सुद्धा दिल्या आहेत. रमजानच्या सणामध्ये मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये जमतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव बघता यावेळी कोणीही यावेळीच मशिदीमध्ये एकत्र येऊ नये. मशिदीमधून मौलवी अजान करतील. सर्वांनी आपल्या घरी राहून नमाज पठण करावे. त्यासाठी अनेक जिल्ह्यात मौलवींनीदेखील तशाच प्रकारची विनंती लोकांना केली असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.