गोंदिया- धानाचा कोठार अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धानाची शेती करण्यात येते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी घटल्याने पिकांची लागवड पूर्णतः होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी कोरोडा दुष्काळ घोषित करावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेनी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात १ जुन ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १ हजार ३२७ मि. मि पाउस पडतो. ऐेवढा पाउस धान लागवडीसाठी अनुकूल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. यंदा एकूण १ लाख ७७ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. त्यापैकी २९ जुलैपर्यंत ७१ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पुर्ण झाली आहे. तर १ लाख १ हजार हेक्टरवरील रोवणी अद्याप शिल्लक आहे. मात्र, जुलै महिना संपत आला तरी पावसाने अद्यापही मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी सुध्दा गाठलेली नाही. परिणामी, सुरू असलेल्या धानाच्या रोवण्या देखील पुर्णपण खोळंबल्या आहे. मागील वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी फक्त २४ % पाऊस पडला तर दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत पडत असलेल्या पावसाच्या तुलनेत यावर्षी ५० % पाऊस कमी पडला. त्यामुळे पावसाअभावी रोवण्या लांबत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. तर, दुसरीकडे ७१ हजार हेक्टरवर केलेल्या रोवण्यासुध्दा पावसाअभावी वाळण्याच्या मार्गावर आल्या आहे. रोवणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये आतापासुनच भेगा पडण्यास सुरूवात झाली असून, उन्ह देखील चांगलेच तापत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी भर पडली आहे.