गोंदिया- संपूर्ण राज्याला परतीच्या व अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातही या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला तर त्याचे पंचनामेही अद्याप सुरूच आहेत. या भयावह परिस्थितीतून शेतकरी सावरत नाही तर दुसरीकडे तिरोडा तालुक्यातील एकोडी येथील शेतकऱ्यांच्या आता अस्मानी संकटापाठोपाठ सुल्तानी संकटाचा सामना करावा लागत आहे.
जलाशयाचे पाणी शेतात शिरल्याने ८० एकरातील धानाची नासाडी हेही वाचा-अजित पवार दिशाभूल करत आहेत; भाजपसोबत आघाडीचा प्रश्नच नाही, शरद पवारांचा पलटवार
तिरोडा तालुका अंतर्गत येत असलेल्या एकोडी येथील शेतकऱ्यांची शेतजमीन लागून असलेल्या संग्रामपूर जलाशयाच्या ओलीता खाली येते. सर्व शेती तलावाच्या मुख्य कालवा व १ व २ वितरकेला लागून आहे. दरम्यान याच वितरीकेच्या विसर्गावर येथील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात शेतीची कामे केली. अशात धान पीक कापणी करून ठेवलेली धान शेतात असताना वितरीकेतून पुन्हा पाण्याच्या विसर्ग होऊ लागला. यावर शेतकऱ्यांचा उभ्या धानातून २ ते ३ फूट रुंद व खोल नाली करून पाणी वाहून जाण्यासाठी वाट करून दिली. याची सुचना संबंधित विभाग व पाणी वाटप संस्थेलाही देण्यात आली. त्याच बरोबर पाण्याचा विसर्ग थांबविण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, विसर्ग होत असलेल्या पाण्याला वाट करून दिल्याने सर्व शेत जमीन कोरडी झाली. शेतकऱ्यांनी शेतातील धानाची कापणी करून धानाचे कडपे शेतात ठेवले. मात्र, पाठबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे कालवा बंदच करण्यात आले नाही. परिणामी वितरीकेतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ होऊन पाणी संपूर्ण शेतात शिरले. त्यामुळे ५० शेतकऱ्यांचा सुमारे ८० एकर शेतातील कापलेल्या धानाचे कडपे व उभ्या धानाचे नुकसान झाले.
सद्यास्थितीत शेताच्या बांध्यात अर्ध्या फुटावर पाणी असल्याने धानाचे कडपे पाण्यात बुडाल्याचे चित्र असून धान पाखड व काळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जलाशयाचा कालवा पुर्णत: बंद करावा व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी त्याच बरोबर संबंधित विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. संबंधित पिडीत शेतकऱ्यांनी २५ हजार रुपये एकरी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसे निवेदनही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, पाठबंधारे विभागाला दिले आहे.