गोंदिया- गोंदिया जिल्ह्यातील निर्बंधात शिथिलता करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा पूर्वीप्रमाणे सुरू झालेला आहे. अशात दिवसभरात कित्येक नागरिकांच्या संपर्कात येऊन तेथूनच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी ‘सुपर स्प्रेडर्स’ ठरणाऱ्या व्यापाऱ्यांवर गोंदिया नगर परिषदेने लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. यासाठी नगर परिषदेने आता व्यापाऱ्यांना दर 15 दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. तसेच त्यांना दुकानात निगेटिव्ह अहवाल ठेवावा लागणार आहे, असे न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी तोंडावर मास्क, नियमीत हात स्वच्छ धुणे तसेच शारीरीक अंतराचे पालन या त्रिसूत्रीचे पालन करण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिक या नियमांचे पालन करत असून त्यांना हे सहज शक्यही आहे. मात्र, व्यापाऱ्यांना दिवसभरात कित्येक नागरिकांचा सामना करावा लागत असून, अशात व्यापारी बाधित होऊ शकतात. त्यांच्यापासून अन्य नागरिक बाधित होऊ शकतात. कित्येक ठिकाणी असे घडले असून यामुळेच व्यापाऱ्यांना ‘सुपर स्प्रेडर्स’ म्हटले जाते. अशात या ‘सुपर स्प्रेडर्स’वर नियंत्रण मिळवता आल्यास कोरोनाचा प्रादुर्भावही आटोक्यात आणणे शक्य आहे. यासाठी आता गोंदिया नगर परिषदेने शहरातील व्यापाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. व्यापाऱ्यांपासून अन्य नागरिकांत कोरोनाचा प्रसार होऊ नये. यासाठी नगरपरिषदेने व्यापाऱ्यांसाठी नगरपरिषदेत आरटीपीसीआर चाचणीची सोय केली आहे. येथे व्यापाऱ्यांना दर 15 दिवसांनी त्यांची चाचणी करावयाची आहे. एवढेच नव्हे तर, या व्यापाऱ्यांना त्यांचा निगेटिव्ह अहवाल दुकानात ठेवायचा आहे. असे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार, असे आदेशच नगर परिषदेने काढले आहेत.