गोंदिया - जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी नाल्यामध्ये प्रेमीयुगलाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या दोघांनीही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये संदीप यशवंत कावळे (वय 23 वर्षे) व संगीता बोहरे (वय 16 वर्ष, रा. कनेरी) यांचा समावेश आहे. हे दोघेही काही दिवसांपासुन घरातून पसार झाल्याचे समोर आले आहे.
कनेरी नाल्याजवळ दुर्गंध येत असल्याची कुजबुज गावात सुरू होती. त्यानंतर गावकऱ्यांनी शोध घेतला असता नाल्याजवळील झुडपात युवक युवतीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. गावकऱ्यांनी याची माहिती डुगीपार पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी दाखल होत तपास सुरू केला असता दोन्ही मृतांची ओळख पटली.