गोंदिया- प्रेमाचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या सारस पक्षांच्या गणनेला सुरुवात झाली आहे. त्यांची अचूक व शात्रीय पद्धतीने गणना व्हावी यासाठी ५० हुन अधिक सारसप्रेमी यासाठी पुढाकार घेत आहेत. गोंदिया तसेच मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सारस पक्षांची गणना करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सारस पक्षी ही गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे.
'प्रेमाचं प्रतिक' असलेल्या सारस पक्ष्याच्या गणनेला सुरुवात; फक्त गोंदियातच उरले अस्तित्व महाराष्ट्रात सारस हा पक्षी एकट्या गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. त्याचप्रमाणे हा पक्षी दुर्मिळ होता चाललेला आहे. त्यामुळे आज घडीला या सारस पक्ष्याचे संवर्धन करण्याची मोठी गरज आहे. गेल्या काही वर्षात त्यांची संख्या थोड्या फार प्रमाणात वाढलेली आहे. आज गोंदिया जिल्ह्याचे वैभव समजल्या जाणाऱ्या सारस पक्षाचा अधिवास निवडक ठिकाणी असल्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था, शेतकरी व सारसप्रेमी त्यांच्या संवर्धनाचे काम करत आहेत.
सध्या या संस्था, शेतकरी व सारसप्रेमी सारस गणनेच्या कामाला लागल्या आहेत. भल्या पहाटे-पहाटे ही सर्व मंडळी सूर्योदयाचा आधी एकत्रित जमा होऊन सारस अधिवास असलेल्या ठिकाण निवड करून घेतात. प्रत्येक जण आपापली जबाबदारी घेत सारसच्या शोधात हे सारस प्रेमी निघतात.
आज गोंदिया व भंडारा आणि लगतच लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यात सुद्धा गणना सुरु आहे. या तिन्ही जिल्ह्यात तब्बल ५० ते ६० सारसप्रेमी सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणारे शेतकरीही त्यांच्या शास्त्रीय पद्धतीने गणना करत आहेत. ही गणना यावर्षी १३ जून ते १८ जूनपर्यंत चालणार असून यामध्ये गोंदिया, भंडारा, व बालाघाट या तीन जिल्ह्याचा समावेश आहे. मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यात ३८ सारस तर नजीकच्या बालाघाट जिल्ह्यात ४८ च्या जवळपास सारस पक्षी आढळले होते. तर सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी अनेक पक्षी प्रेमी संस्था आणि शेतकरी समोर येत आहेत. या दृष्टिकोनातून सारसचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनही समोर येत आहे. आज सारस हा पक्षी जगातील सर्वात मोठा उडणाऱ्या पक्षात मोडतो. शिवाय एका सारसचा मृत्यू झाल्यास दुसरा सारस देखील मृत्यूला कवटाळतो. त्यामुळे प्रेमाचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या या सारस पक्ष्याच्या संवर्धनासोबतच त्यांचे संरक्षण करणे देखील गरजेचे आहे.
सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी अनेक युवक मंडळी समोर येत आहे. सुरुवातीच्या काळात गोंदिया जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतके सारस पक्षी होते. मात्र गेल्या काही वर्षात विविध गैर सरकारी संस्था तसेच पक्षी प्रेमी व शेतकरी तर्फे त्यांच्या संवर्धनासाठी समोर आल्यामुळे सारस पक्ष्यांच्या संख्येत थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षी प्रेमी तसेच स्थानिक प्रशासनाला एकत्रीत येत त्यांच्या संवर्धनाचेकाम करण्याची गरज आहे. त्यातूनच जिल्ह्याचे वैभव समजल्या जाणाऱ्या सारस या सुंदर पक्षाला वाचवण्यात यश येईल.