गोंदिया -जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास व प्रशासनास सहकार्य न केल्यास १० हजार रुपयचा दंड आकारण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हाधिकारी यांनी 'माझा जिल्हा, माझी जबाबदारी' या मोहिमे अंतर्गत आदेश काढून आजपासून या मोहिमेला सुरवात केली. स्वतः जिल्हाधिकारी या मोहिमेत सहभागी होऊन आज ७० पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढत त्यांच्या घरावर नोटीस लावण्यात आले आहेत.
'माझा जिल्हा, माझी जबाबदारी' कोरोनाबाधित उपचाराकरता रुग्णालयात नाही गेल्यास १० हजाराचा दंड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या उपक्रमा अंतर्गतच जिल्हाधिकारी दीपक मीणा यांनी 'माझा जिल्हा, माझी जबाबदारी' या मोहिमेला आज रविवार २७ सप्टेंबर पासून जिल्ह्यात सुरवात केली आहे. 'माझा जिल्हा, माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत घरातच गृहविलगीकरणात असलेल्या परंतु जिल्हा प्रशासनाला माहिती न देणाऱ्या कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेत त्यांना शासकीय प्रकिया पार पाडत प्रशासनाला सहकार्य करण्या करता सांगितले.
या मोहिमेसाठी संबधित विभागाचे विभाग प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांचे १६ पथके तयार करण्यात आले आहेत. यात अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह इतर विभागप्रमुखांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात विभागप्रमुखा सोबत एक पोलीस कर्मचारी व एक नगरपरिषदेचा कर्मचारी देण्यात आलेला आहे. ही मोहीम आज गोंदिया शहरात राबविण्यात आली.
गोंदिया शहरात या मोहिमेला रामनगर परिसरात जिल्हाधिकारी दीपक मीणा, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बबन आव्हाड, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. भुषण रामटेके यांच्या उपस्थितीत आज सुरवात करण्यात आली. आज पहिल्या दिवशी ७० गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना माहिती देत त्यांच्यावर माहिती लपविल्या प्रकरणी दंड आकारण्या सोबतच त्यांना सल्ला देत प्रशासनाला सहकार्य करुन इतरांना व कुटूबीयांना सुरक्षित ठेवण्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोना संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेले जिल्ह्यात जवळपास 1200 रुग्णांनी आपली माहिती जिल्हा प्रशासनाला अद्याप दिली नसल्याचे समोर आल्याने त्यांची शोध मोहीम या 'माझा जिल्हा, माझी जबाबदारी' मोहीमेतंर्गत सुरू करण्यात आली आहे.