गोंदिया - डोंगरगाव डेपो परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे सदर परिसरात वन्य प्राण्यांचा अधिवास अधिक प्रमाणात आहे. तसेच या परिसराला नवेगाव-नागझिरा अभयारण्य लागून असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी ये-जा करत असतात. तसेच हे ठिकाण बफरझोन असून खडकी परिसरात येते. त्यामुळेच या भागात वन्य प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होत असते.
अशाच प्रकारे चितळची शिकार झाली असल्याची माहिती सडक-अर्जुनी वन विभागाला मिळाली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई यांनी आपल्या पथकासह चितळची शिकार करून त्याचे मांस शिजवत असलेल्या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी मांस शिजवणाऱ्या वसंत सुका मेश्राम (५१) याला अटक केली.