गोंदिया -चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस कोठडीतच आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी, गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस निरीक्षकासह, सहायक पोलीस निरीक्षक तसेच तीन पोलीस शिपायांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करीत त्यांनाअटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून एक सहायक पोलीस निरीक्षक हा पसार झाला आहे.
काय आहे प्रकरण?
२० मे रोजी आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कुंभारटोली जिल्हा परिषद शाळेत 3 चोरटयांनी दरोडा घातला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तीन आरोपींना अटक करीत २१ मे रोजी आमगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. माझ्या भावाला बेदम मारहाण केली असून त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या बहिणीने केला होता. दरम्यान, मृत राजकुमार याच्या शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचे उघडकीस आले असून, अमानुषपणे मारहाण केल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झाले आहे.