गोंदिया- जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील निसर्गरम्य वनाने नटलेल्या भागात ब्रिटिशकालीन हाजराफॉल धबधबा वसलेला आहे. मात्र, कोरोनामुळे हा धबधबा गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटकांची निराशा झाली होती. तर धबधब्यातील पर्यटनावर परिसरातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, तो सुद्धा बंद असल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे, शासनाने धबधबा पर्यटनासाठी सुरू करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वन व्यवस्थापन समितीने केली होती. या मागणीला यश आल्याने आता येत्या १ नोव्हेंबरपासून हाजराफॉल धबधबा पर्यटकांसाठी खुला होणार असल्याने पर्यटक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचना व आदर्श कार्यपध्दतीचे हाजराफॉल पर्यटनस्थळी काटेकोरपणे पालन करण्यात येईल. पर्यटकांना सुध्दा कोविड-19 करिता दिलेल्या अटी व नियमांच्या अधीन राहूनच पर्यटनस्थळी प्रवेश दिला जाईल. 65 वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. हाजराफॉल येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल, असे न करणाऱ्या पर्यटकांना पर्यटन क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही.