गोंदिया- अभिनेता विजय राजच्या अडचणीत वाढ झाल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर विनयभंग केल्याची तक्रार गोंदियाच्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. शेरनी चित्रपटाच्या शूटिंग क्रूमधील महिलेची छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून विजय राजला पोलिसांनी अटक केली आहे.
अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या शेरनी या चित्रपटाचे शूटिंग गोंदिया शहरापासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सुरू आहे. यासाठी चित्रपटाचा क्रू गोंदियातील हॉटेल गेटवेमध्ये गेल्या १५ दिवसांपासून मुक्कामास आहे. यावेळी शूटिंग क्रूमधील ३० वर्षीय महिलेची विजय राजने छेडछाडकेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती.
प्रशासनाकडून सारवासारव
शूटिंग क्रूमधील महिलेने दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी कलम ३५४ (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज याला अटक करण्यात आली आहे. आज दुपारी २ वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणाविषयी पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. हॉटेल गेटवे प्रशासनाकडूनही सारवासारव करण्यात येत असून पत्रकारांनाही हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.