गोंदिया - जिल्ह्याची धान उत्पादक जिल्हा अशी ओळख आहे. जिल्ह्यात यावर्षी खरेदी करण्यात आलेल्या खरीप हंगामाचे धान शासकीय खरेदी केंदावर पडून आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची धान खरेदी प्रक्रिया थांबली आहे. धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे. यासाठी गुरूवारी गोंदियात जिल्ह्यात भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जेव्हा जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येते तेव्हा तेव्हा धान खरेदी थांबते. असा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सरकारवर आरोप केला आहे. तर १० जूनपर्यंत धान खरेदी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
गोंदियात भाजपचे जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन धान खरेदी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा -
रब्बी धान उत्पादक शेतकर्यांचे धान आगामी दहा दिवसात खरेदी करावे, या प्रमुख मागणीसह शेतकरी हिताच्या विविध मागण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्ह्यातील आठही तालुक्यात धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान संबंधित अधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. दहा दिवसात धान खरेदी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
धान खरेदी केंद्राच्या फोटोसेशनमध्ये नेत्यांची धन्यता -
या दरम्यान, मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. निवेदनात, जिल्ह्यात रब्बी धानाची अंदाजे ६५ हजार हेक्टरवर लावगड करण्यात आली असून अंदाजे २९ लक्ष क्विंटलचे उत्पादन अपेक्षित आहे. शेतकर्यांनी धानाची कापणी केलेली आहे. मात्र शासनाकडून आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यास दिरंगाई झाल्याने त्यांना आपले धान पडक्या किंमतीत विकावे लागत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. धान खरेदी केंद्राचे उद्धाटनाच्या फोटोसेशनमध्ये सरकारमधील नेते धन्यता मानत आहे. मात्र प्रत्यक्षात धानाची खरेदीच सुरु झाली नाही.
धानावरील बोनस शेतकर्यांचा खात्यात जमा करावा -
जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्रावरुन येत्या दहा दिवसात धान खरेदी सुरु करण्यात यावी. यासोबतच धानावरील बोनस जाहीर होऊन आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही बोनस मिळाला नाही. तो त्वरीत शेतकर्यांचा खात्यात जमा करण्यात यावा, नियमीत कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन अनुदान त्वरीत देण्यात यावे, शेतकर्यांना विद्युत जोडणी तातडीने देण्यात यावी, आदी मागण्या घेऊन. या आंदोलनात माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री परिणय फुके यांच्यासह आजी माजी आमदार उपस्थित होते.
हेही वाचा - वीर जवान कापगते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार