गोंदिया - पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आज (ता. २७ फेब्रुवारी) भाजप महिला मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. गोंदियातही भाजप महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी गोंदिया येथील जयस्तंभ चौकात खासदार कार्यालयाजवळ भाजप महिला मोर्चाने वन मंत्री संजय राठोड यांचे पोस्टर जाळत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन गोंदिया शहर पोलिसांना दिले आहे.
बीडच्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव विरोधकांकडून घेतले जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर सुरुवातीच्या काळात मंत्री संजय राठोड काही दिवस नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर ते सर्वांसमोर आले. परंतु, त्यांनी या प्रकरणात त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळत माझी व माझ्या कुटुंबीयांची बदनामी करू नये, असे पत्रकार परिषदेत म्हटले होते. मात्र, राज्य शासनाने देखील या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची पावले उचलली नाहीत. तसेच, मंत्री राठोड यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. मंत्री राठोड यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. पूजाला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच आंदोलनावेळी गोंदियात भाजप महिला मोर्चाने मंत्री संजय राठोड यांचे पोस्टर जाळले.
जयस्तंभ चौकात जाळले मंत्री राठोड यांचे पोस्टर