गोंदिया - केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरून तब्बल 15 वर्षानंतर प्रवासी विमान वाहतूक सेवेला सुरूवात होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येत्या महिन्याभरात इंदौर-गोंदिया-हैदराबाद या विमान सेवेला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. विमानतळ प्राधिकरणानेसुध्दा याला दुजोरा दिला आहे. डिजीसीएने विमानाचे निरीक्षण केल्यानंतर सेवा पुरविण्याची परवानगी दिली आहे.
बिरसी विमानतळ 15 वर्षांपासून उड्डाणाच्या प्रतीक्षेत
गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे तत्कालीन केंद्रीय उड्डाणमंत्री प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ २००५ मध्ये तयार करण्यात आले. या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्रही आहे. येथील प्रशिक्षीत झालेले वैमानिक देशात विविध ठिकाणी सेवा देत आहेत. या विमानाचा वापर मंत्री किंवा व्हीआयपी तसेच दिग्गज व्यक्ती आल्या तरच होतो. प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सेवेला अद्यापही प्रारंभ झाला नव्हता. मात्र, गोंदिया-भंडाराचे खासदार सुनील मेंढे यांनी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे आता मागील 15 वर्षांपासून उड्डाणाच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील बिरसी विमानतळावरून खासगी प्रवास वाहतुकीसाठी उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी आवश्यक असणारी डायरेक्ट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशनने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोंदिया-इंदौर-हैदराबाद अशी प्रवासी वाहतूक विमानसेवा सुरू होणार आहे.
गोंदियासह मध्य प्रदेश, छत्तीगडलाही होणार फायदा
केंद्र शासनाच्या उड्डाण योजना व आरसीसी फेस ४ अंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यासाठी दिल्ली येथील फलाय बिग कंपनीने कंत्राट घेतले आहे. त्यामुळे बिरसी विमानतळावरून जुलै महिन्यात प्रवासी विमान वाहतूक सेवेचा टेकऑफ होणार आहे. यामुळे गोंदियासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातीलही प्रवाशांना मोठी मदत होणार आहे.