गोंदिया - महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्ल्यूची साथ सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. जिल्ह्यात ८ ते २२ जानेवारी दरम्यान १५१ पक्ष्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यापूर्वी पुणे प्रयोगशाळेत पाठविलेल्या नमुन्यांचा अहवाल विभागातर्फे कळविण्यात आला आहे. गोंदिया तालुक्यातील बिर्सी विमानतळ क्षेत्रातील एक कावळा, गोरेगाव तालुक्यातील कु-हाडी येथील एक बगळा व नागझिरा अभयारण्य क्षेत्रातील एक पोपट प्राथमिक चाचणीत एच-५ करीता पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर हे नमुने पुढील खात्रीकरीता राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत.
या क्षेत्रांमध्ये सर्वेक्षणाचे काम चालु आहे. बिर्सी, कु-हाडी व नागझिरा क्षेत्रांसह कुक्कुट पक्ष्यांमध्ये मृत्यू झालेल्या गोंदिया तालुक्यातील एकोडी व गोरेगाव तालुक्यातील निंबा या संवेदनशील भागात सतर्कता क्षेत्र म्हणुन घोषित करून आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडुन करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात द्यावी, अशा सुचना पशुसंवर्धन विभागाने केल्या आहेत.