गोंदिया - कोरोनाच्या कालावधीत गोंदियामध्ये विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांना आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर येण्यास बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत सर्वात मोठी समस्या एचआयव्ही ग्रस्तांना भेडसावत होती. कारण त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यातच त्यांच्या प्रकृतीवर फरक पडू शकतो. परंतु, गोंदिया आरोग्य विभागाच्या एआरटी (एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र) चे कर्मचारी देवदूत म्हणून पुढे आले आहेत.
स्वयंसेवी संस्थांच्या समुपदेशकांच्या माध्यमातून ते पीडित व्यक्तींच्या घरी जाऊन औषधे आणि सल्ला देत त्यांचे संरक्षण करण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १ हजार ७३३ एचआयव्ही पीडित पूर्णपणे सुरक्षित आहेत. गोंदिया जिल्ह्यात कोरोनाला थांबविण्यासाठी लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळण्यात येत आहेत. वाहतूक व्यवस्था ही बंद असल्यामुळे एचआयव्हीग्रस्त रूग्णांना औषधे व सल्ला घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. जिल्ह्यात एकूण २ हजार ८१३ रूग्ण आहे. यातील काही रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर काही जिल्ह्याच्या बाहेर आहेत. यापैकी १ हजार ७३३ रूग्णांना लॉकडाउनच्या दरम्यान त्यांच्या घरी जाऊन सेवा दिली जात आहे.