गोंदिया- विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाणारी दारू चिचगडच्या पोलीस गस्ती पथकाने पकडली. महाका गावाकडून पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ (सीजी 07 ए एम 7006) या वाहनातून 2 लाख 98 हजारांजी विविध प्रकारची दारू जप्त केली आहे.
यामध्ये एकूण २ लाख ९८ हजाराची दारू व ७ लाख रूपये किंमतीचे वाहन असा एकूण ९ लाख ९८ हजारांचा माल जप्त करण्यात आला. या संदर्भात आरोपी द्वारका उर्फ राजू पलटन वर्मा (वय २७ वर्षे, रा.खुलेंद्राता, डोगरगड) व सिध्दार्थ संजय सोनकुवत (वय १९ वर्षे, रा.भिलाई) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई), ७७ (अ), ७२, ८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - गोंदियात दिव्यांग मतदार बांधवांची रॅली, मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यालगत असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून दारूची तस्करी केली जात आहे. चिचगड पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर दारु तस्करी होत असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाला आहे.
पोलीस आणि निवडणूक विभागाची यंत्रणा सज्ज
विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातून दारु आणि पैशाची तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आणि निवडणूक विभागाने सीमा तपासणी सुरु केली असून नाक्यावर चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा लावले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबरपासून लागू झाली तेव्हापासूनच पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची यंत्रणा सुध्दा सज्ज झाली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी नाके स्थापन केले असून आत्तापर्यंत पोलिसांनी लाखो रुपयांच्या दारुचा साठा जप्त केला आहे.