गोंदिया - बहुप्रतिक्षित आणि मागील अनेक वर्षांपासून उड्डाणाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोंदिया येथील बिरसी विमानतळातून येत्या १३ मार्च रोजी हवाई वाहतूक सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. परिषदेत फ्लायबिग विमान कंपनीचे संजय मांडवीया, खासदार सुनिल मेंढे, बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे निदेशक के.व्ही बैजू सदस्य गजेंद्र फुंडे, डाॅ. प्रशांत कटरे आदी उपस्थिती होते.
खासदार मेंढे यांनी म्हटले की, या विमानतळावरून डोमेस्टिक फ्लाइट (घरगुती उड्डाण) सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याने जिल्हावासियांत उत्साह दिसून येत आहे. तर, येत्या १३ मार्च रोजी या विमानतळावरून पहिले प्रवासी विमान सकाळी 8.30 मिनिटांनी हैद्राबादकरीता उड्डाण घेणार आहे. विमना सेवेला माजी मंत्री प्रफुल पटेल यांनी देखील शुभेच्छा दिल्या. गोंदिया जिल्ह्यातील व्यापारी व पर्यटनाला मोठा प्रतिसाद मिळणार आहे.
खासदार सुनील मेंढे यांनी बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून विषय लावून धरला होता. गोंदिया येथील बिरसी विमानतळ तयार होऊनही प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाली नव्हती. या ठिकाणी प्रशिक्षित झालेले वैमानिक देशात विविध ठिकाणी सेवा देत आहेत. मात्र, प्रवासी वाहतुकीचा प्रश्न शासन दरबारी रेंगाळत होता. तो खासदार मेंढे यांनी सातत्याने पाठपुरावा करीत निकाली काढला आहे.
केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उड्डाण योजनेंतर्गत गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यास मंजुरी देत 13 मार्च ही तारीख निश्चित केली. त्या अनुषंगाने फ्लायबिग विमान कंपनीचे संजय मांडवीया, खासदार सुनिल मेंढे, बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे निदेशक के.व्ही बैजू सदस्य गजेंद्र फुंडे, डाॅ. प्रशांत कटरे आदींच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. यात सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तराचे बिरसी येथील विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
गोंदिया मार्गे इंदूर, हैदराबाद, विमानसेवा प्रत्यक्षात सुरू होत आहे. बिग चार्टर एअर लाइन्स (फ्लाय बिग) या कंपनीने बिरसी विमानतळावरून मध्य प्रदेशातील इंदूर-गोंदिया-हैदराबाद आणि हैदराबाद ते गोंदिया-इंदूर येथे प्रवासी विमानसेवेला हिरवी झेंडी दाखविली आहे. यामुळे गोंदिया जिल्हा आता चार्टर विमानसेवेने जोडला जाणार आहे. विमानतळाचा परवाना देण्यासाठी डीजीसीएच्या पथकाने बिरसी विमानतळाची धावपट्टी व सुरक्षेचे निरीक्षण केल्यानंतर क्षेत्रीय विमानसेवा सुरू करण्यास हिरवी झेंडी दिली आहे.
1 मार्चपासून तिकिट विक्रीला सुरवात
‘फ्लाय बिग’ या विमान कंपनीद्वारे इंदूर-गोंदिया-हैदराबाद व हैदराबाद-गोंदिया-इंदूर विमानसेवा सुरू करण्यासाठी कंपनीने ७२ खुर्ची एटीआर विमान निवडल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक संजय मांडविया यांनी दिली. सोबतच या मार्गावर 1 मार्चपासून प्रवाशांना आपले तिकिट बुकींग ऑनलाईन करता येणार असल्याचे सांगितले. गोंदिया विमानतळावरही आफलाईन बुकिंगची सोय करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 72 आसन क्षमता असलेल्या या विमानात पहिल्या 36 प्रवाशांना 1999 रुपयात गोंदिया ते हैद्राबाद व गोंदिया ते इंदोर तिकीट उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. त्यांनतर 2600 रुपयापर्यंत तिकिटाचे दर जाणार असेही सांगितले. दरदिवशी इंदुर येथून सकाळी 7 वाजता हे विमान निघेल व गोंदियाला 8.15 वाजता पोहचेल. गोंदियावरून सकाळी 8.45 वाजता निघेल व हैद्राबादला 10.15 वाजता पोहचेल. तेच विमान सायकाळला परत येईल.