गोंदिया - जिल्याच्या सालेकसा तालुक्यातील भजेपार गावातील शेतकऱ्यांनी विहिरीत बसून आंदोलनाला सुरूवात केली आहे. हे आंदोलन विहिरीचे अनुदान न मिळाल्याने करण्यात येत आहे. 20 दिवसांचा कालावधी झाला. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाला सुरूवात केली आहे.
विहिरीत उतरुन केले आंदोलन, दोन वर्षांपासून अनुदान रखडल्याने शेतकरी अडचणीत व्यापाऱ्यांनी पैसे देण्याचा तगादा लावला आहे
आज सकाळी 6 वाजेपासून या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या योजनेअंतर्गत 134 लाभार्थ्यांनी विहिरीचे बांधकाम केले आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून, काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून उधार साहित्य घेऊन, तर काही शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून हे काम पुर्ण केले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शासनाने निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आता सर्व व्यापाऱ्यांनी पैसे द्या असा तगादा शेतकऱ्यांकडे लावला आहे. दरम्यान, शेतकरी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे जे नुकसान झाले आहे, त्यामुळे मोठा संकटात आहे. त्यामध्येच हे संकट आल्याने शेतकऱ्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
आम्ही विहिरीतून बाहेर येणार नाही
अनुदानासाठी प्रशासनाने 15 दिवसाची मुदत मागितली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, आज 20 दिवस झाले तरी अनुदान मिळाले नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आज सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा एकदा आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात छगन बहेकार, प्रल्हाद बहेकार, जागेश्वर ब्राम्हणकर, टायकराम ब्राम्हणकर अशी या विहरीत बसून आंदोलन करण्याऱ्या शेतकऱ्याची नावे आहेत. दरम्यान, जोपर्यंत आम्हाला अनुदान मिळणार नाही तोपर्यंत आम्ही विहिरीतून बाहेर येणार नाही अशी भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.