गोंदिया -जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प तब्बल सात महिन्यानंतर पुन्हा आज सुरु करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांचा जंगलसफारीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ऑफलाईन इंट्री न मिळाल्याने अनेक लोकांना परत जावे लागले. व्याघ्र प्रकल्पात खासगी वाहानांना बंदी असताना देखील अनेक वाहने प्रकल्पात जाताना दिसत आहेत.
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. तेव्हापासून राज्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद होती. त्याचा परिणाम पर्यटन स्थळांवर रोजगार अवलंबून असलेल्या लोकांवर होत होता. मात्र आता हळूहळू राज्यातील पर्यटन स्थळे सुरू करायला सरकारने परवानगी दिली आहे. आजपासून गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पर्यटकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. हा व्याघ्र प्रकल्प सुरू झाल्याने या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या जीपसी चालकांना दिलासा मिळाला आहे.