गोंदिया- जिल्ह्यातील बिरसी विमानतळासमोर अतिक्रमित घरांवर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला. मागील ४० वर्षांपासून २२ कुटुंबांनी अतिक्रमण करत या ठिकाणी आपले संसार थाटले होते. मात्र कोरोना सारख्या महामारीच्या काळात रोजगार उपलब्ध होत नसताना या २२ कुटुंबातील नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली, त्यामुळे प्रशासनाने आमची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी या रहिवाशांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तंबू ठोकत ठिय्या दिला आहे.
२२ घरांवर चालला बुलडोझर-
बिरसी विमानतळासमोर मागील ४० वर्षा पासून हे २२ कुटुंब अतिक्रमण करून रहात असून दोन वर्षा आधी म्हणजे २०१८ ला बिरसी विमानतळ प्राधिकरणाने यांच्या करिता सावर्जनिक शौचालयाची निर्मिती करून दिली होती. मात्र विमानतळ प्राधिकरणाने याच लोकांच्या घरावर बुलडोझर चालवून त्याची घरे जमीनीदोस्त केली आहेत. तर अनेक लोकांना त्याचे साहित्य देखील घरा बाहेर काढू दिले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार त्यांच्या डोळ्यादेखत मातीमोल झाले आहेत.