गोंदिया- नागपूरवरून गोंदियाला दारू घेऊन येणाऱ्या वाहनाचा आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास एकोडी या गावाजवळ अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अपघात झालेल्या गाडीमध्ये ठेवलेली दारू लोकांनी लुटली. यामुळे दारू घेऊन जाणाऱ्या वाहनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गोंदिया तालुक्यांतर्गत येत असलेल्या एकोडी गावाजवळ आज १४ मार्चला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नागपूरवरून गोंदियाकडे जात असलेल्या गाडी क्रमांक एमएच २७ ॲक्स ४३१९ या गाडीला समोरून येणाऱ्या अदानीच्या टिप्पर ट्रकने साईड न दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या कडेला गाडी पलटली असून हा अपघात झाला असल्याचे अपघात झालेल्या वाहन चालकांनी सांगितले आहे.
अपघात झालेल्या वाहनात असलेली विदेशी दारू असल्याने अपघात होताच स्थानिकांनी व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी अपघात झालेल्या गाडीतून दारू लुटायला सुरुवात केली. याची माहिती स्थानिक पोलिसांना होताच गंगाझरी पोलीस घटनास्थळी पोहचून दारू लुटणाऱ्या लोकांना पळवून काढले व अपघात झालेल्या वाहनातील असेलल्या दारूचा साठा दुसऱ्या गाडीत ठेवण्यात आले. मात्र, या अपघाताने लाखोंचे नुकसान झाले असल्याचे चालकांनी सांगितले आहे.