गोंदिया- पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षांत प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. गोंदियासारख्या आदिवासीबहुल भागातदेखील महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. गोंदियातील राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आगारात महिलाराज असल्याचे पाहायला मिळते.
विशेष म्हणजे या ठिकाणी महिला एसटी दुरुस्त करतात. येथील कार्यशाळेत हातात पाना, स्क्रू-ड्रायव्हर, हातोडा, ऑइल घेऊन काही महिला बसेसची दुरुस्ती करतात. तब्बल 9 महिला मेकॅनिक गेल्या 6 वषापार्सून हे काम करत आहेत. एसटीच्या मेकॅनिक विभागात दाखल होण्याची महिलांची मानसिकता नसते. कारण येथे मोठ्या प्रमाणात अंगमेहनत करावी लागते. यामुळे या क्षेत्रात महिलांचा ओघ कमी असतो. मात्र, गोंदियामध्ये महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
हेही वाचा -... अन् आई-वडिलांचा जीव पडला भांड्यात
गोंदियातील एसटी दुरुस्ती कार्यशाळेत अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा ब्रेक सेक्शनही महिला मेकॅनिक हाताळतात. एवढेच नव्हे तर, गोंदियाच्या आगारात 28 महिला वाहक, 7 महिला वाहतूक नियंत्रक आणि डेपो मॅनेजरसुद्धा महिलाच आहे.
महिला मेकॅनिक यांना यंत्रअभियंत्यांनी त्यांच्या कौशल्यानुसार कामाची विभागणी करून दिली आहे. सकाळी 8 ते 4.30 पर्यंत या महिला वर्कशॉपमध्ये काम करतात. एसटीवर शेकडो प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. त्यामुळे एसटीच्या देखभालीचे काम काळजीपूर्वक आणि जबाबदारी असते. ते काम या महिला करतात.
वर्कशॉपमध्ये ब्रेकलाईन तपासण्याचे सर्वात महत्त्वाचं आणि मानसिक तणावाचे कामही या ठिकाणी महिलाच करतात. या मेकॅनिक महिला कुटुंब, संसार, मुलं या जबाबदाऱ्या सांभाळून हे काम करत आहेत. सुरुवातीला, जेव्हा या महिला मेकॅनिक म्हणून एसटी वर्कशॉपमध्ये हजर झाल्या. त्यावेळी या महिला एसटी दुरुस्तीचे काम कसे करणार? अवजड पार्टस कसे उचलणार? हे प्रश्न उभे राहिले होते. मात्र, या महिलांनी जिद्द आणि चिकाटीने ब्रेक सेक्शन, इंजिन सेक्शन, मशिन, बॉडी, डीडब्लू, सबस्टोअर, फ्रंट, गियर बॉक्स या विभागात त्या काम करतात. तर आगारातील 28 महिला वाहकदेखील दिवस-रात्र लालपरीच्या सेवेसाठी झटत आहेत. त्यामुळे कोणालाही अभिमान वाटावा, असे या महिलांचे काम आहे.
हेही वाचा -गोंदियात गारांसह अवकाळी पाऊस, रब्बी पिकांचे नुकसान