गोंदिया - वेगवेगळ्या ठिकाणातून चोरी झालेल्या 13 मोटारसायकल तिरोडा व गोरेगाव हद्दीतून जप्त करून डुग्गीपार पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. रोहित सावलदास पुंडे (वय 19), बंटी उर्फ उमेश दुर्गाप्रसाद बोपचे (वय 24, दोन्ही रा. सोनी, ता. गोरेगाव) व गोलू उर्फ दिलीप देवचंद पटले (वय (26, रा. मानेगाव, ता. आमगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गोंदियात 13 दुचाकीसह 3 आरोपींना अटक असा घडला प्रकार
तक्रारदार तौशिक कलीम शेख (वय 32) रा. सडक अर्जुनी यांनी आपली मोटारसायकल (एमएच 35 डीजी-5564) दुरुस्तीसाठी विनोद भांडारकर रा. कोसबी यांच्या न्यू केजीएन मोटार सायकल रिपेरिंग दुकानासमोर दुरुस्तीसाठी आणून ठेवली होती. अज्ञात चोरांनी ती मोटारसायकल रात्रीला संधी साधून पळविली. ही चोरी 27 ते 28 मेच्या रात्रीच्या दरम्यान घडली. तौशिक शेख यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपास ठाणेदार सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार हरिश्चंद्र शेंडे करीत होते. गुन्ह्यात चोरी गेलेल्या मोटारसायकलचा तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगडे आपल्या स्टाफसह डुग्गीपार व गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या क्षेत्रात करीत होते. दरम्यान गोपनीय सूत्रांनी माहिती दिली, एक दिवसापूर्वी सुदर्शन केवलराम बिसेन (रा. हिरापूर ता. गोरेगाव) यांच्याकडे ग्रे रंगाची मोपेड गाडी आणली आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी हिरपूर येथील सुदर्शन बिसेन यांचे घर गाठले. त्यांच्या घरासमोर एमएच 31 डीजी-5564 क्रमांकाची गाडी आढळली. त्यावेळी सुदर्शन बिसेन व देवलाबाई केवलराम बिसेन (वय 45) घरीच होते. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता ती गाडी सडक-अर्जुनी येथील केजीएन मोटारसायकल दुरूस्तीच्या दुकानासमोरून चोरी करून आणल्याचे सांगितले. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक वांगडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपास केला. रोहित पुंडे, बंटी उर्फ उमेश बोपचे व गोलू उर्फ दिलीप पटले यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्यांचा मोटारसायकल चोरीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यावरून त्यांना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणातून चोरी करून आणलेल्या एकूण 13 मोटारसायकल गोरेगाव व तिरोडा हद्दीतून विविध ठिकाणातून जप्त केल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय अधिकारी (देवरी) जालंधर नालकुल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिन वांगडे व त्यांचा स्टाफ पोलीस हवालदार हरिश्चंद्र शेंडे, जगदेश्वर बिसेन, पोलीस नायक सुरेश चंद्रिकापुरे, पोलीस शिपाई सुनील डहाके, घनश्याम मुळे यांनी केली आहे.
हेही वाचा -हर्बल पावडरच्या नावाखाली 4 कोटी रुपयांची फसवणूक, १० पैकी ३ आरोपींना अटक