गोंदिया -दुबईहुन गोंदियातील तिरोडा तालुक्यात एकत्रित परतलेल्या काही नागरिकांचे स्वॅब (घशातील स्त्रावाचे) नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी १२ जुन ते १४ जुनपर्यंत प्रत्येकी एक-एक असे तीन दिवसात ३ कोरोना रुग्ण जिल्ह्यात आढळून आले होते. मात्र, आज (सोमवार) १५ जून रोजी तबब्ल १४ लोकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे.
गोंदियात दुबईहुन परतलेल्या काही नागरिकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा आता १७ वर पोहोचला आहे. तर, आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ८६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात १० जुनपर्यंत नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झालेली नव्हती. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले सर्वच रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.