गोंदिया - जिल्यात १५ जानेवारीला १८९ ग्रामपंचाती करीता मतदान होत आहे. अशातच ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेवटची ग्रामपंचायत व नक्षलग्रस्त भागात असलेल्या भरनोली गट ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या १२ गावांतील नागरिकांनी भरनोली गट ग्रामपंचायतचे विभाजन करून स्वतंत्र राजोली ग्रामपंचायतची निर्मिती करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत भरनोली ग्रामपंचायती करीता एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असुन, ५ जानेवारी पासून निवडणुक प्रचारालासुध्दा सुरूवात झाली. भरनोली गट ग्रामपंचायतचे विभाजन करून स्वतंत्र राजोली ग्रामपंचायत तयार करण्यात यावी, ही अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची मागणी आहे. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत भरनोली, तिरखुरी, राजोली १, राजोली २, खडीक १, खडकी २, सायगाव, तुकूम, नवीनटोला, शिवरामटोला, बलीटोला, बोरटोला, या गावातील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मागणी पुर्ण होत नाही, तोपर्यंत ठाम राहणार व समोर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार ठाकण्याचे निर्णय सर्व गावकऱयांनी घेतला आहे.
या आहेत मागण्या
भरनोली गट ग्रामपंचायतचे विभाजन करून स्वतंत्र राजोली ग्रामपंचायत तयार करण्यात यावी, गावातील विकास कामांसाठी निधी देण्यात यावा. गावकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यावे. स्वतंत्र राजोली ग्रामपंचायत तयार करण्यात यावी ही मागणी अनेक दिवसांपासून आहे. यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यांनी दखल न घेतल्याने ग्रामपंचायत निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजोली स्वतंत्र ग्रामपंचायत घोषित झाल्यास गावातील विकासकामांना गती मिळेल. तसेच गावकऱ्यांची विविध कामांसाठी होणारी पायपीटसुध्दा कमी होईल. त्यासाठी राजोलीला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्याची मागणी अनेक दिवसांपासून आहे.