गोंदिया - सडक अर्जुनी तालुक्यातील डूगिपार येथे मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे अनेकदा समोर आले आहे. या गोवंशांना वाहनात टाकून सडक अर्जुनी तालुक्यातून त्यांची वाहतूक केली जाते. अशीच एका वाहनातून काही गोवंशाची वाहतुक होत असल्याची माहिती बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी पांढरी-कोसमतोंडी मार्गाने जात असलेल्या सदर वाहनाला थांबवून पोलिसांना याची माहिती दिली.
एका पिकअप गाडीतून (क्रमांक एम.एच. 36-एफ 1956) 12 गोवंश कत्तलीसाठी नेत असल्याचे त्यांना आढळून आले. पांढरी येथील रेल्वे क्रॉसिंगवर ही गाडी अडवण्यात आली. त्यानंतर हे वाहन डुग्गीपार पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.