गोंदिया- गर्भवती महिला व लहान मुलांना रुग्णसेवा देता यावी यासाठी आरोग्य विभागाकडून १०२ रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते़. मात्र, शासनाकडून कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीकडून या रुग्णवाहिकेवर पुरवण्यात आलेल्या वाहनचालकांना वेळेवर व नियमानुसार वेतन देण्यात येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ७८ रुग्णवाहिकांच्या चालकांनी १८ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. तसेच कामबंद आंदोलनही केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका सेवा विस्कळीत झाली आहे़. ज्याचा फटका गर्भवती महिला रुग्ण व बाल रुग्णांना बसत आहे़.
रुगणवाहिका चालकांचे कामबंद आंदोलन हेही वाचा -शिवसेनेबाबत सोनिया गांधींशी कोणतीही चर्चा झाली नाही - शरद पवार
रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा, त्यांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून १०८ व १०२ ही रुग्णवाहिका सेवा पुरवण्यात आली आहे़. अपघात घडल्यास तातडीने आरोग्य सेवा देता यावी यासाठी १०८ ही सेवा पुरवण्यात येते. त्याचप्रमाणे गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अथवा लहान मुलांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी १०२ या टोल फ्री क्रमांकाची सेवा पुरवण्यात येते. तर, याचे कंत्राट मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ येथील अश्कोम मीडिया प्रा़. लिमीटेड या कंपनीला देण्यात आले आहे़. कंपनी अंतर्गत जिल्ह्यात ७८ रुग्णवाहिका असून त्यावर चालक उपलब्ध करून देण्यात आले आहे़त. मात्र, संबंधित विभागाकडून या वाहनचालकांना तुटपुंज्या स्वरूपात मानधन देण्यात येत असून त्यांच्याकडून २४ तास सेवा घेण्यात येते़. त्यामुळे मानधनात वाढ करण्यात यावी व इतर मागण्यांना घेऊन रुग्णवाहिकेच्या चालकांनी शासकीय रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालक संघटना, गोंदिया जिल्हाच्या माध्यमातून संबंधित कंपनी व संबंधित आरोग्य विभागाकडे मागणी केली होती. मात्र, अद्यापही मागणी पूर्ण करण्यात आली नाही़. परिणामी आपल्या मागण्यांना घेऊन १८ नोव्हेंबर रोजी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, यांना निवेदन देऊन रुगणवाहिकेच्या चालकांनी आमरण उपोषण पुकारले असून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे़.
सदर निवेदनानुसार केंद्र शासनाने २४ जुलै २०१९ ला लागू केलेल्या नियमानुसार कामगारांचा बेसीकमध्ये वाढ करून जुलै २०१९ पासून मानधन देण्यात यावे, साप्ताहिक सुट्टी, सी़एल़ इ़एल, व मेडीकल आदी रजा मंजूर करण्यात याव्यात़, कामाचे आठ तास निश्चित करणे, जास्ती काम झाल्यास अतिरिक्त मोबदला देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे़. विशेष म्हणजे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, असा पवित्रा रुग्णवाहिका चालकांनी घेतला आहे़. त्यामुळे जिल्ह्यातील ही महत्वाची सेवा खोळंबली असून याचा फटका मात्र, रुग्णांना बसत आहे़.