गोंदिया -देवरी तालुक्यात अवैध गौण खनिज प्रकरणी देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी धडक कारवाई केली आहे. तहसीलदारांनी 6 ठिकाणी धाडसत्र राबवत 1 कोटी 1 लाखांचा दंड ठोठावला आहे. तर दोन जणांवर गुन्हा देखील दाखल केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील गौण खनिज माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
देवरीत अवैध गौणखनिज प्रकरणी 1 कोटी 1 लाखांची दंडात्मक कारवाई तहसीलदारांची धडक कारवाई
देवरी तालुक्यात अवैध गौण खनिजाचे उत्खनन, वाहतूक व साठवणूक होत असल्यामुळे राज्य शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. या बाबीची दखल घेत देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी गौणखनिजाच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी कंबर कसली व कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत देवरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात काही लोकांकडे गौणखनिजाची साठवणूक असल्याची माहिती मिळताच त्यांच्या घटनास्थळी पंचनामा करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
तहसीलदारांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक
शहरातील ४ व्यापाऱ्यांकडे रेती, गिट्टी बोल्डर, मोठ्या प्रमाणात अवैधरित्या परवानगी न घेता साठवून ठेवल्याचे दिसून आले. यामुळे देवरी तहसीलदारांनी गैर अर्जदाराविरुद्ध दंडात्मक कारावईचे आदेश निर्गमित करीत एक कोटी एक लाखाचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे अवैध गौणखनिज उत्खनन व साठवणूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर दुसरीकडे तहसीलदारांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या धडक कारावईमुळे राज्य शासनाच्या महसूलामध्येही भर पडत आहे. तर दुसरीकडे तस्कराच्या माध्यमातून होत असलेल्या बुडीत महसूलालाही ब्रेक लागले आहे.
विशेष कारवाईमुळे तहसीलदार चर्चेत
देवरी येथे तहसीलदार म्हणून विजय बोरुडे हे मागील ४ वर्षांपासून कार्यरत आहेत. देवरी तहसील कार्यालयाचा कार्यभार सांभाळताच त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या कामासह शासनाच्या महसुलात भर पाडण्यासाठी अनेक नाविण्य उपक्रम राबविले. यामुळे त्यांचे नाव जिल्ह्यात चांगलेच चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी अर्थसाहाय्य योजनेचा लाभ देण्यासाठी गृहभेट आपुलकीची हा अभिनव उपक्रम राबविला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून अर्थसाहाय्य योजनेपासून अनेक वंचित गरजू लाभार्थ्यांचा शोध त्यांनी घेतला. हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे. त्याच बरोबर अवैध गौणखनिज उत्खनन व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेली कारवाईची मोहीम ही देखील त्यांच्या उत्तम कार्यप्रणालीचे परिचय देत आहे.
हेही वाचा -राज्यात इंधनदराचा भडका; अनेक जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपार