गडचिरोली- एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथे रविवारी १३ गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांची क्लस्टर कार्यशाळा पार पडली. यावेळी गावांमधील दारूविक्री व खर्राविक्री बंद व्हावी, यासाठी स्वाक्षरी आंदोलन छेडण्यात आले. तसेच गावातील दारूबंदी, गाव संघटनेचे बळकटीकरण यासह इतरही विषयांवर यावेळी चर्चा झाली. दरम्यान, यावेळी शेकडो नागरिकांनी सह्या करून या आंदोलनात सहभाग नोंदवला.
गट्टा, जारावंडी, मोहंडी, कुर्जेमर्का, येरडसमी, गोरगुट्टा, मटवर्षी, वाढवी, नयनवाडी, गर्देवाडा आणि जिलनगुडा येथील महिला व पुरुष कार्यशाळेला उपस्थित होते. यातील अनेक गावांनी खर्राबंदी केली आहे. ही बंदी अशीच टिकून राहावी आणि गावातील तंबाखूचे प्रमाण कमी करतानाच घरोघरी गाळल्या जात असलेल्या मोहफुलाच्या दारूवर कसा प्रतिबंध आणता येईल, याविषयी कार्यशाळेत चर्चा झाली.
एटापल्ली तालुक्यातील बहुतेक गावे ही आदिवासी बहुल असल्याने येथे पेसा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्याने गावांना स्वतःच्या हिताचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. या कायद्याचा वापर करून पेसा अंतर्गत गावात दारू व खर्राबंदी यशस्वी करण्याविषयी मुक्तिपथ तालुका चमूने मार्गदर्शन केले. दारूमुळे होणारे घरगुती वाद, मारहाण याबाबतचे गावातील अनुभव या कार्यशाळेत महिलांनी सांगितले. दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यासाठी महिलांनी संघटीत होण्याच्या उद्देशाने स्वाक्षरी आंदोलन घेण्यात आले.
पोलिसांनी दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशा मागणीवर गाव संघटनेतील ६० कार्यकर्त्यांसह गावातील शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी केल्या. सोबतच आपापल्या गावात जाऊन अशाचप्रकारे लोकांच्या सह्या घेऊन हे निवेदन तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.