गडचिरोली- जिल्ह्यातील पेंढरी पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस मदत केंद्रांतर्गत सिनभट्टी जंगलात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास नक्षलवादी आणि पोलिसांच्या सी-60 पथकामध्ये चकमक उडाली. या चकमकीत 16 लाखांचे बक्षीस असलेली जहाल महिला नक्षली सृजनक्का उर्फ जैनी चैतु अर्का (48) हिला ठार करण्यात पोलिसांना यश मिळाले. तिच्यावर 144 गंभीर गुन्ह्याची नोंद होती. महिला नक्षलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आज (शनिवार) दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्यादरम्यान नक्षल अभियानावर तैनात पथक मोहीम राबवित होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सी-60 च्या कमांंडोंनीही गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार करण्यात येत होता. मात्र, पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलींनी जंगलात धूम ठोकली.
पोलिसांनी घटनास्थळाचा शोध घेतला. तेव्हा घटनास्थळावर महिला नक्षली सृजनक्का हिचा मृतदेह सापडला. तसेच घटनास्थळी पोलिसांना एक एके-47 रायफल, प्रेशर कुकर, क्लेमेर माईन तसेच मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य सापडून आले. पोलिसांनी प्रेशर कुकर व क्लेमेर माईन घटनास्थळीच नष्ट केले. याठिकाणी नक्षलवाद्यांनी कॅम्प टीसीओसी सप्ताहाच्या अनुषंगाने देशविघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते. मात्र गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा डाव उधळून लावला आहे.