गडचिरोली- नक्षलवाद्यांच्या भामरागड एरिया कमिटीची सदस्य असलेल्या महिला नक्षलीला शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी अटक केली. पार्वती ऊर्फ सुशीला शंकर सडमेक असे तिचे नाव असून तिच्यावर 6 लाखांचे बक्षीस होते.
हेही वाचा - अल्पवयीन मुलीला फूस लावून तरुणाकडून स्नॅक्स सेंटरमध्ये लैंगिक शोषण
पार्वती ऊर्फ सुशीला ताडगाव पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मडवेली गावातली रहिवासी असून ती नक्षली बिच्छूची पत्नी आहे. 2006 पासून ती बाल नक्षली म्हणून दलममध्ये सहभागी झाली होती. 2008 ते 2010 पर्यंत नर्मदाक्काची ती अंगरक्षक होती. दरम्यान, 2010 ते 2012 पर्यंत जांबिया गट्टा दलममध्ये कमांडो रामकोसोबत ती महिला संघटनेचे काम पाहत होती. त्यानंतर 2012 ते 2014 पर्यंत भामरागड एलओसीची उपकमांडर म्हणूनही काम केले. सद्यस्थितीत एरिया कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती.
भामरागडमधील नैनवाडीतील डूंगा कोमटी मडावी यांच्या हत्येच्या आरोपावरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी शुक्रवारी तिला अटक केली. दरम्यान, शनिवारी तिला न्यायालयात उपस्थित केले असता तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पार्वतीवर 6 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते आणि तिच्यावर जिल्ह्यात 24 हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली अटक हे पोलिसांचे यश मानले जात आहे.