गडचिरोली - शौचासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर येथे शुक्रवारी पहाटे घडली. माया जगदीश हलदार (65) असे मृताचे नाव आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; गडचिरोली जिल्ह्याच्या ठाकूरनगरातील घटना - gadchiroli leopard attack news
गावालगतच्या जंगलात गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर येथे घडली.
चामोर्शी तालुक्यातील घोट वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ठाकूरनगर येथील माया हलदार पहाटेच्या सुमारास शौचासाठी गेल्या असता, गावालगतच्या जंगलात लपून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात बिबट्याने महिलेच्या नरडीचा घोट घेतल्याने ती जागीच ठार झाली. गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन घोट वनपरिक्षेत्र कार्यालयाला याची माहिती दिली. मायाच्या पश्चात तीन मुली आहेत. सध्या धान कापणीच्या हंगामाला सुरुवात झाली असल्याने शेतकरी बाहेर पडत आहेत. अशातच बिबट्याने महिलेवर हल्ला करून ठार केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने नरभक्षक बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.