गडचिरोली - कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून शाळा बंद आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यात प्रथमच ऑनलाइन शिक्षण पॅटर्न राबवला जात आहे. मात्र, अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यात नेटवर्क अभावी ऑनलाइन शिक्षण अद्याप 'नॉटरिचेबल'च आहे. या समस्येवर गडचिरोलीतील वसा गावातील शिक्षकांनी उपाय शोधला आहे. त्यामुळे गावातील घरांच्या भिंती आता विद्यार्थ्यांना धडे देत आहेत. या उपक्रमात पालकांनीही सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील 'वसा' गाव कौतुकास पात्र ठरत आहे.
गडचिरोलीतील 'वसा' या गावात भिंतींचे फळे करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे कोरोनामुळे शाळा बंद, विद्यार्थी त्रस्त -
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भवामुळे मार्च महिन्यात शाळा बंद करण्यात आल्या. या सात महिन्यांच्या या काळात विद्यार्थ्यांची शाळेशी असलेली नाळ तुटण्याची भीती आहे. अनेक विद्यार्थी शाळेविना कंटाळले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी-पालकांकडून शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सद्यस्थितीत शाळा सुरू करणे धोक्याचे ठरू शकते. यावर उपाय म्हणून राज्यात सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.
गडचिरोलीत ऑनलाइन शिक्षण 'फेल' -
अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोबाईल सेवा पोहचलेली नाही. जिथे मोबाईल सेवा आहे तिथे अनेक पालक गरीब असल्याने विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देऊ शकत नाही, अशा विविध कारणांमुळे गडचिरोलीतील ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग अयशस्वी झाला आहे. ज्या गावांमध्ये मोबाईल सेवा नाही किंवा विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याचा शिक्षण विभाग विविध प्रयोग करून धडे देत आहे. असाच उपक्रम गडचिरोली तालुक्यातील वसा गावच्या शिक्षकांनी सुरू केला.
शिक्षकांनी घरांच्या भिंती केल्या बोलक्या -
वसा गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. त्यात गावातील 69 विद्यार्थी शिक्षण घेतात. गावातील अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. त्यामुळे येथील शिक्षकांनी नवी शक्कल लढवत गावातील वार्डांमध्ये 8 ब्लॅकबोर्ड (फळे) तयार केले. या ब्लॅकबोर्डवर दररोज चारही वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ लिहून ठेवला जातो. सायंकाळी त्या-त्या वर्गातील विद्यार्थी ब्लॅकबोर्डवर लिहिलेला होमवर्क आपल्या पाठ्यपुस्तकात लिहून घरी जातात आणि पालकांच्या उपस्थितीत गृहपाठ पूर्णकरून दुसऱ्या दिवशी शिक्षकांना दाखवतात. नित्यनेमाने हा उपक्रम राबवला जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान काही प्रमाणात टळले आहे.