गडचिरोली - देशात १५ ते २० वर्षांमध्ये गिधाडांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात अनेकदा गिधाडे आढळून येतात. या गिधाडांचे संवर्धन व्हावे, यासाठी गडचिरोली वनविभागाने ‘गिधाड उपहारगृह’ उभारले आहे. या उपहारगृहात गिधाडांना अन्न पुरवले जात असून या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी चामोर्शी व धानोरा या 2 मार्गांवर 16 संदेशात्मक मोठे फलक वनविभागाने उभारले आहेत. या मार्गाने जाताना हे संदेशात्मक फलक प्रत्येक नागरिकाचे लक्ष वेधून घेत आहेत.
गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये गिधाडांची संख्या 99 टक्क्यांनी घटल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. या गिधाडांचे संवर्धन व्हावे, त्यांना अन्न उपलब्ध व्हावे या हेतूने गडचिरोली वनविभागाने नवेगाव व मारकबोडी येथे गिधाड उपहारगृह उभारले आहे. या उपहारगृहात मृत जनावरे ठेवली जातात. मात्र, मृत जनावरांवर मोकाट कुत्रे डल्ला मारत असल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी त्या उपहारगृहाला तारेचे कुंपन करण्यात आले आहे. गावातील ढोरफीडीच्या जागेवर हे उपहारगृह उभारण्यात आले असून तारेच्या कुंपनासाठी गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारचे आणखी ३ उपहारगृह मालेरमाल, मुडझा आणि माडेतुकूममध्ये प्रस्तावित करण्यात आली आहेत. लवकरच ही ३ उपहारगृहे सुरू होणार आहेत.
हेही वाचा - सिरोंचा पोलीस जवानांनी तमदाला गावातील ग्रामस्थांसोबत साजरी केली दिवाळी