महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहेरीत २५ लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त - Gadchiroli latest News

गुरुवारी मध्यरात्री कृषी विभागाच्या भरारी पथकाने 25 लाख रुपयांचे बीटी बियाणे भरुन येत असलेला ट्रॅक्टर जप्त करुन कारवाई केली. कृषी विभागाने पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केली आहे.

Gadchiroli District News
गडचिरोली जिल्हा बातमी

By

Published : Jun 6, 2020, 9:38 PM IST

गडचिरोली - गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्र राज्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील शेतकरी महाराष्ट्र राज्यातील दक्षिण गडचिरोली भागातील सिरोंचा व अहेरी तालुक्यात कापूस लागवड करतात. तर सध्या स्थानिक शेतकरी देखील त्यांचे अनुकरण करत मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करत आहेत. त्यामुळे कापूस बियाणे विक्री वाढली आहे. याचा फायदा घेत आंद्रप्रदेश व तेलंगाणा राज्यातून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने अनधिकृतपणे बोगस बीटी बियाण्याची आयात सुरू आहे.

गुरुवारी मध्यरात्री कृषी विभागाच्या भरारी पथकाने 25 लाख रुपयांचे बीटी बियाणे भरुन येत असलेला ट्रॅक्टर जप्त करुन कारवाई केली. कृषी विभागाने पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की तेलंगाणा राज्याच्या सीमापार करून राज्यात बोगस बियाणे भरून ट्रॅक्टर येत असल्याची माहिती अहेरी तालुका कृषी अधिकारी दिपक कांबळे, पंचायत समिती कृषी अधिकारी पी.पी.राऊत, मंडळ कृषी अधिकारी संदेश खरात यांना मिळाली होती. त्यानुसार कृषी विभागाने टीम घेऊन रात्री 11.30 च्या दरम्यान तेलंगणामधून येत असलेला ट्रॅक्टर (एपी-07- ईई-0932) अहेरी तालुक्यातील खामनचेरू रोडवरील राजपूर पॅच जंगल परिसरात थांबवला. ट्राक्टरची तपासणी केली असता, ट्रालीमध्ये बोगस बियाणांची 25 पोती आढळून आली.

पोत्यांमध्ये एकूण 2 हजार 500 पाकिट होते. त्यापैकी 2 पाकिट पुढील लॅब तपासणी करण्याकरता नागपूर येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे यांनी दिली आहे. या कारवाईत ट्रॅक्टरसह 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ट्रॅक्टर चालकावर महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009 कलम 12 (1) (2), पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कलम 15 अंतर्गत अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहेरी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details