गडचिरोली - तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले मजूर गावाकडे परत येत असतानाच होळीच्या दिवशी त्यांच्यावर काळाने झडप घातली. आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्ली जवळ असलेल्या चंदनखेडी फाट्यावर शिवशाही बस आणि पीकअप या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जण जागीच ठार तर १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
बसची पीकअपला समोरासमोर धडक -
तेलंगाणा राज्यातून मिरची तोडणाऱ्या मजुरांना घेऊन ब्रम्हपुरीकडे जाणारी पिकअप वाहन क्र. टी एस ०४ यु डी ५८४० आणि प्रवाशांना घेऊन भंडारावरून अहेरीकडे येणाऱ्या शिवशाही बसमध्ये चौडमपल्ली जवळील चंदनखेडी फाट्यावर समोरासमोर जोरदार धडक बसली. यात पीकअप वाहनाच्या चालकासह एक मजूर जागीच ठार झाला. या घटनेत तब्बल १० जण गंभीर असून त्यांना चंद्रपूर आणि गडचिरोली येथे हलविले आहे. तर उर्वरित ५ जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.