गडचिरोली - तालुक्यातील महादवाडी व कुराडी जंगलात दोन वेगवेगळ्या वाघांच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दोन महिला ठार झाल्या. या दोन्ही घटना सोमवारी (दि. 10 मे) सकाळी उघडकीस आल्या. या घटनेने खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर लोक तेंदूपत्ता तोडण्याच्या कामी जंगलात सकाळपासूनच जात आहेत. आज (सोमवारी) पोर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या महादवाडी व कुराडी या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक तेंदूपत्ता सोडण्यासाठी गेले होते. यात पहिली घटना महादवाडी जंगलात सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. महादवाडी येथील कल्पना दिलीप चुधरी (वय 37 वर्षे) महिला आपल्या सहकाऱ्यांसमवेत तेंदूपत्ता तोडण्याचे कामात मग्न असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात कल्पना जागीच मरण पावली. वाघाचा हल्ला होताच तिने किंकाळी फोडली. लगेच आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे वाघ तिथून पळून गेला.
दुसरी घटना महादवाडी पासून साडेतीन किलोमीटर अंतरावर कुराडी गावालगतच्या जंगलात सकाळी साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान घडली. यात सिंधुबाई दिवाकर मुनघाटे (वय 56 वर्षे) महिलेचा मृत्यू झाला. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही वाघ किशोरवयीन म्हणजे दीड ते दोन वर्षे वयाचे होते. घटनेची माहिती मिळताच पोला वनपरिक्षेत्र अधिकारी चांगले आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांचे पंचनामे करून शवविच्छेदनासाठी पाठविले असून मृतांच्या वारसांना तत्काळ दहा हजार रुपये सानुग्रह सहायता केली आहे. नियमानुसार वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे कळते.
दरम्यान, वनविभागाने गडचिरोली परिसरात वाघांचा वावर असल्याचे सांगत नागरिकांनी जंगलात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. परंतु तेंदूपत्ता हे या भागातील नागरिकांसाठी पावसाळ्यातील चार महिन्यांच्या उदरनिर्वाहासाठीच्या उत्पन्नाचे साधन असते. अशा वेळी जंगलात जाणे कसे काय थांबवू शकतात, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. वनविभागाने वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यानिमित्ताने पुढे येत आहे.
हेही वाचा -गडचिरोलीत 12 कोविड नियंत्रण कक्षातून रुग्णांना मदतीचा हात; गृहविलगीकरण अन् बेडची उपलब्धतेची माहिती