गडचिरोली - दाम दुप्पट करून देण्याच्या नावाखाली नागरिकांना लुबाडणाऱ्या सनशाईन कंपनीच्या दोन संचालकांना गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. रमेशचंद्र गणपतसिंह नायक (रा.छायन, झाबुआ-मध्यप्रदेश) व किसनलाल बसराम मेरावत (रा. राठधनराज,बासवारा-राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा... फोन टॅपिंग प्रकरण: दोन सदस्यीय समिती करणार चौकशी - गृहमंत्री
काय आहे प्रकरण ?
रमेश्चंद्र नायक व अन्य सात जणांनी सनशाईन हायटेक इन्फ्राकॉम नामक कंपनी स्थापन केली. त्यांनी या कंपनीच्या शाखा ठिकठिकाणी उघडल्या. गडचिरोलीतही या कंपनीची शाखा होती. कंपनीने कमी कालावधीत जास्त रकमेचे आमिष दाखवून अभिकर्त्यांमार्फत ठेवीदारांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. गडचिरोली शाखेत ५१ अभिकर्त्यांमार्फत २,१३७ नागरिकांनी २ कोटी २९ लाख ३ हजार ४९० रुपये गुंतवले. परंतु ऑक्टोबर २०१५ मध्ये कंपनीने अचानक गडचिरोली येथील कार्यालय बंद केले. पुढे बऱ्याच कालावधीनंतर ठेवीदारांनी तक्रार केल्याने गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.