गडचिरोली- कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे १ मे'ला नक्षल्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात १५ जवान आणि एक खासगी चालकाला वीरमरण आले होते. या प्रकरणी घटनेची मास्टरमाईंड नर्मदाक्का व तिचा पती किरण याला 11 जूनला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर घटनेचा तपास सुरू असताना स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिलीप श्रीराम हिडामी (२२) व परसराम मनिराम तुलावी (२८) (दोघेही रा. लवारी ता. कुरखेडा) अशी यांची नावे आहेत.
गडचिरोली : जांभुळखेडा भूसुरुंग स्फोट प्रकरणी आणखी दोघांना अटक
या प्रकरणी घटनेची मास्टरमाईंड नर्मदाक्का व तिचा पती किरण याला 11 जूनला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर घटनेचा तपास सुरू असताना स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे. 11 जूनला नक्षल्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्या तसेच वेस्टर्न सबझोनल प्रमुख उप्पगुंटी निर्मलाकुमारी उर्फ नर्मदाक्का (वय - ५८ रा. कोडापावनुरू गलावरम मंडल जिल्हा कृष्णा आंध्रप्रदेश) व तिचा पती राणी सत्यनारायणा उर्फ किरण उर्फ किरणदादा (७० रा. नरेंद्रपुरम अमलापुरम जवळ राजानगरम मंडल जिल्हा इस्ट गोदावरी आंध्रप्रदेश) यांना सिरोंचा येथून अटक करण्यात आली होती. या दोघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
या कोठडीदरम्यान १ मे रोजीच्या स्फोटाची चौकशी करण्यात आली. त्यावेळी इतर नक्षल्यांच्या सहभागाबाबत विचारपूस करताना दिलीप हिडामी आणि परसराम तुलावी यांची नावे समोर आली. या माहितीच्या व अन्य तांत्रिक पुराव्याच्या आधारे दोघांनाही कुरखेडा पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेमुळे स्फोटाच्या घटनेच्या तपासाला आणखी गती मिळणार आहे.