गडचिरोली - नागपूर पदवीधर मतदार संघासाठी उद्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात 21 मतदान केंद्र असून 12 हजार 391 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 8 हजार 954 पुरुष मतदार तर 3 हजार 436 इतके महिला मतदार आहेत. विशेष म्हणजे, राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान असले, तरी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मात्र सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान करता येणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या तयारीवर ईटीव्ही भारतचा रिपोर्ट जिल्ह्यात 21 ठिकाणी मतदान केंद्र - गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर मतदारांसाठी प्रत्येक तालुक्यात तसेच तहसील कार्यालयात 21 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये मतदान केंद्र 17 व सहाय्यकारी मतदान केंद्र 4 आहेत. देसाईगंज 2, कुरखेडा 2, कोरची 1, आरमोरी 2, गडचिरोली 5, धानोरा 1, चामोर्शी 2, मुलचेरा 1, एटापल्ली 1, अहेरी 2, भामरागड 1 व सिरोंचा येथे 1 ठिकाणी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्र हे तहसील कार्यालयात उभारले आहेत.
तक्रारीकरिता असेल कंट्रोल रूम -
पदवीधर निवडणुकीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखेमध्ये कंट्रोल रुमची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी मतदारांना मदत करणे, तक्रारींची नोंद घेणे, तसेच आचारसंहितेचा भंग याबाबत माहिती दिली व घेतली जाणार आहे. याठिकाणी 07132-222086 या क्रमांकावर नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे.
फोटो असलेले ओळखपत्र आवश्यक -
मतदान प्रक्रिया ही मतपत्रिकाद्वारे होणार आहे. यावेळी मतदारांनी मतदान ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र नसेल, तर छायाचित्र असलेले ओळखपत्र यात पासपोर्ट, पॅनकार्ड, लायसन, पदवी-पदवीधर प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड यापैकी कोणतेही ओळखपत्र सादर करणे गरजेचे आहे.
कोविडबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन-
सध्या कोरोना संसर्ग असल्यामुळे प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मोमीटर, सॅनिटायजर, शारीरिक अंतर राखण्यासाठी आखण्यात आलेली व्यवस्था तसेच अनेक उपाययोजना करण्यात आली आहेत. मतदारांनी मास्कचा वापर करावा व निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले, मतदान प्रक्रियेतील कर्मचारी व कोरोना बाधित असलेल्यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे.
कलम 144 लागू-
रविवारपासून जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मतदान केंद्र परिसरात पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यावर बंदी आहे. सर्व मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात शांततापूर्ण वातावरण राहावे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी अधिकाराचा वापर करून सर्व मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश काढले आहे.
हेही वाचा - नागपुरात कार चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर नेले फरफटत; घटना सीसीटीव्हीत कैद