गडचिरोली -अहेरी तालुक्यातील आपापल्ली गावात सायकलवरून कॉलेजला जात असताना पुलावर तोल गेल्याने नाल्यात पडून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेवंता गणपत सातपुते असे विद्यार्थिनीचे नाव असून ती बारावीला होती.
गडचिरोलीतील आपापल्लीत तोल गेल्याने नाल्यात पडून विद्यार्थिनीचा मृत्यू - गडचिरोली news
अहेरी तालुक्यातील आपापल्ली गावात सायकलवरून कॉलेजला जात असताना पुलावर तोल गेल्याने नाल्यात पडून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शेवंता व तिच्या दोन मैत्रिणी बुधवारी अकरा वाजताच्या सुमारास सायकलने कॉलेजमध्ये जात होत्या. दरम्यान मंगळवारी सायंकाळपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सुभाषनगर नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. पुलावरून जात असताना शेवंताचा अचानक तोल गेल्याने ती पाण्यात पडली. याच वेळेस सोबत असलेल्या दोन मैत्रिणींचा सुद्धा तोल गेला. मात्र त्यांना सावरता आले. तर शेवंता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली, त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गावकरी व पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढून कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आला आहे. याचा जास्त फटका दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली तालुक्यांना बसला आहे.