गडचिरोली -जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी गडचिरोली पोलीस दल मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारानेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मुंबई येथील मुख्य कार्यक्रमात आदिवासी 'रेला नृत्या'चे सादरीकरण करण्यात आले. या नृत्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात महेंद्र आलामी ग्रुप पेठा, बेडगाव ग्रुप आणि येदरंगा रेला नृत्य संघ जिमलगट्टा यांचा समावेश होता.
आदिवासी पारंपारिक नृत्य सादर करताना अभिमानाने हृदय भरून आल्याचे सहभागी संघांतील नागरिक म्हणाले. त्याचबरोबर गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने आम्हाला आमची संस्कृती जगासमोर मांडता आल्याची भावना व्यक्त करत त्यांनी गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.
आदिवासी तरुणांची आवड लक्षात घेऊन 'वीर बाबुराव शेडमाके कब्बडी स्पर्धा', 'वीर बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा', महिलांसाठी 'राणी दुर्गावती हस्तकला स्पर्धा', शेतकऱ्यांसाठी 'वीर बाबुराव शेडमाके कृषी मेळावा', विद्यार्थ्यांसाठी 'प्रोजेक्ट प्रयास', काही कारणास्तव शिक्षणाची वाट सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी मुक्त विद्यापीठ केंद्र दुर्गम भागात सुरू करणे, शासकीय योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना मिळवून देण्यासाठी 'प्रोजेक्ट प्रगती' योजना राबवून आदिवासी बांधवाना जातप्रमाणपत्र मिळवून देणे, बेरोजगार तरुण तरुणीसाठी 'रोजगार मेळावा ऍप'च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न आदी नाविन्यपूर्ण कामे गडचिरोली पोलीस दल करत आहे.