गडचिरोली -कोरोना संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस युद्धपातळीवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर मार्च महिन्यातील वेतन कपातीचे संकट उभे ठाकले आहे. पूर्ण वेतन देण्याचे आदेश प्राप्त न झाल्याने गडचिरोली कोषागार कार्यालयाने वेतन मंजूर करण्यास नकार देऊन देयके परत पाठवली आहेत.
नव्याने आलेल्या जीआरनुसार कपात केलेल्या वेतनाची देयके पाठवण्याची सुचना केली आहे. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलीस आणि आरोग्य विभागाचे वेतन होण्यास विलंब होणार आहे.
राज्याच्या वित्त विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्च रोजी नवा निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार 'अ' आणि 'ब' वर्गाच्या अधिकारी, कर्मचारी यांना मार्च महिन्याच्या देय वेतनाच्या 50 टक्के वेतन पहिल्या टप्प्यात मिळेल, तर 'क' वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन पहिल्या टप्प्यात मिळणार आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांत जीव धोक्यात घालून रात्रंदिवस सेवा बजावणा-या पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या पूर्ण वेतनाचे देयके कोषागार कार्यालयात सादर करण्यात आली होती. मात्र, पूर्ण वेतनाचा कोणताही लेखी आदेश नसल्याने कोषागार कार्यालयाने ही वेतन देयके परत करुन नवीन आदेशानुसार वेतन कपात करून देयके सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या वेतनाला आता विलंब होईल हे स्पष्ट झाले आहे.