गडचिरोली - जिल्ह्यात बाहेरून आलेल्या व प्रशासनाकडून संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्या, पाच जणांचे कोरोना नमुने सोमवारी पॉझिटिव्ह आले. यामध्ये कुरखेडा येथील वेगवेगळया दोन क्वारंटाइन सेंटरमधील 4 आणि चामोर्शीच्या क्वारंटाईन सेंटरमधील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात सापडलेले पाचही रूग्ण मुंबईच्या दहिसर येथून आले असून त्यांना आल्यापासूनच संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले होते.
तीनही ठिकाणावरील कोरोनाबाधित व्यक्तींना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. संबंधित रूग्णांकडून त्यांच्या प्रवासाचे तपशील घेणे सुरू आहे. पॉझिटिव्ह आलेल्या पाचही जणांना आरोग्य विभागाकडून 16 मे रोजी जिल्ह्यात प्रवेश मिळाला आणि त्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांना संस्थात्मक क्वारंटाइन केल्यानंतर बाहेर सामान्य लोकांमध्ये संपर्क आला नसल्याचे, प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियम कडक होणार...
आता पुर्वीपेक्षा थोडे कडक नियम प्रशासनाकडून करण्यात येणार आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. मुंबई, पुणे, नागपूर शहरांसारख्या रेड झोन मधून आलेल्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनाला ०७१३२-२२२०३१ या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.