गडचिरोली - आदिवासीबहुल व नक्षल कारवायांसाठी अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांची दिवाळी नेहमी 'ऑन ड्युटी'च साजरी होते. नक्षलवाद्यांशी दोन हात करताना येथे कार्यरत पोलीस जवानांना दरवर्षीच कुटुंबापासून दूर राहून दिवाळी साजरी करावी लागते. मात्र, यावर्षी येथील पोलिसांची दिवाळी काहीशी वेगळी ठरली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील पात्तागुडम पोलीस मदत केंद्रात कार्यरत पोलीस कुटुंबाला भेट देऊन पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली.
नगर विकास मंत्रीही दिवाळी साजरी करण्यासाठी गडचिरोलीत
यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे नगर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशील अशा हालेवारा पोलीस मदत केंद्राला भेट देऊन पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत पोलीस जवानांचा उत्साह वाढण्यास मदत मिळाली.
आर. आर. पाटील यांनीही नक्षलग्रस्त भागातील पोलिसांसोबत साजरी केली होती दिवाळी
महत्त्वाचे म्हणजे, गेल्या 15 वर्षाचा इतिहास बघितल्यास यापूर्वी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी तीनवेळा पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली.