गडचिरोली -येथील गोंडवाना विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ 28 जानेवारी रोजी चंद्रपुरातील वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मात्र गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसने याविरोधात आंदोलन केल्याने, तसेच विविध शिक्षक संघटनांनी विद्यापीठावर दबाव निर्माण केल्यामुळे चंद्रपूरातील नियोजीत कार्यक्रम रद्द करून, गडचिरोलीमध्येच दीक्षांत समारंभ घेण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी पत्रक काढून विद्यापीठाने माहिती दिली आहे.
विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन
विद्यापीठ गडचिरोलीत असताना दीक्षांत समारंभ चंद्रपुरात आयोजित करण्याचे कारण काय? विद्यापीठ चंद्रपुरात हलवण्याचा कट रचला जातोय, असा आरोप करत गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसने आंदोलन केले होते. चंद्रपुरात आयोजित दीक्षांत समारंभ रद्द न केल्यास कार्यक्रम हाणून पाडण्याचा इशाराही दिला होता. तर विविध शिक्षक संघटनांनीही निषेध नोंदवला होता. विद्यापीठावर शिक्षक संघटनांचाही दबाव वाढल्याने अखेर विद्यापीठाने आज 19 जानेवारी रोजी परिपत्रक काढून चंद्रपुरात आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. आता हा कार्यक्रम 28 जानेवारीला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथेच होणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राहणार उपस्थित
गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०१९-२० च्या विविध पदवी, पदव्युत्तर व पदवीका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदक तसेच पदवी बहाल करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी सभागृहात आयोजीत करण्यात आलेला होता. मात्र आता चंद्रपूर ऐवजी गोंडवाना विद्यापीठ येथे 28 जानेवारीलाच सकाळी 11 वाजता आभासी पद्धतीने हा दीक्षांत समांरभ पार पडणार आहे. दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून नॅक, बंगलोरचे संचालक डॉ. एस. सी. शर्मा, गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी व प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची आभासी उपस्थिती राहणार आहे अशी माहिती या पत्रद्वारे देण्यात आली आहे.