गडचिरोली - एटापल्लीचे तहसीलदार सुभाष यादव (वय ३१) यांचे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. सुभाष यादव हे आलापल्ली येथे पत्नी व मुलासह वास्तव्य करीत होते.
यादव यांना गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास घरीच अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांना दुसरा झटका आला आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - लोकबिरादरी प्रकल्पाचा ४६ वा वर्धापनदिन उत्साहात
सुभाष यादव हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील रहिवासी होते. ते २०१४ च्या तुकडीतील अधिकारी असून, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नायब तहसीलदार म्हणून त्यांची पहिली पदस्थापना झाली. त्यानंतर १३ सप्टेंबर २०१९ रोजी ते एटापल्ली येथे तहसीलदार म्हणून रुजू झाले. मनमिळाऊ व प्रेमळ स्वभाव आणि उत्तम प्रशासन यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - लोकबिरादरीची निरंतर सेवा.. आदिवासींमध्ये राहून त्यांच्यासाठी ४६ वर्षांपासून राबतेय आमटे कुटुंब